खामगाव/संगमनेर (हॅलो बुलढाणा) खऱ्या नोटांच्या बदल्यात चौपट बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांना लुटणाऱ्या भामट्यांच्या टोळीचा संगमनेर शहर पोलिसांनी धडाकेबाज पर्दाफाश केला आहे. दोन लाख रुपये खरे द्या आणि बदल्यात आठ लाख रुपये मिळवा, असे आमिष दाखवत खेळण्यातील ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटांच्या जोरावर फसवणुकीचा काळाबाजार सुरू होता.
शहरातील जनता नगर परिसरात पोलिसांनी सापळा रचून ही टोळी जेरबंद केली. आरोपी बनावट नोटांच्या बंडलच्या वर आणि खाली खऱ्या नोटा ठेवत, तर बंडलच्या मध्यभागी लहान मुलांच्या खेळातील बनावट नोटा भरत होते. वरून बंडल अस्सल दिसत असल्याने नागरिक सहज जाळ्यात अडकत होते.
पोलीस कॉन्स्टेबल सागर नागरे यांच्या फिर्यादीवरून मयुर किशोर सिद्धपुरा (वय ३८, रा. खामगाव), उमेश कांबळे (रा. खामगाव), संदीप धडमवार (रा. नाशिक) आणि गोलू उर्फ शंकर गिरी (रा. शेगाव) या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत पोलिसांनी १ लाख ८५ हजारांची रोख रक्कम, १४ लाख रुपये दर्शनी मूल्याची बनावट बंडले, १० लाखांची टाटा नेक्सॉन कार, तीन मोबाईल आणि इतर साहित्य असा तब्बल १२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या टोळीने यापूर्वी किती नागरिकांना गंडा घातला, यामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा कसून तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.











Total Users : 3215362