डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) परिसरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात डोणगाव पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत रविवारी टेंभुरर्खेड आणि नागेशवाडी येथे धडक कारवाई केली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत एका महिलेसह दोघांना पकडण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून ५ हजार ३६० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
रविवार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय अजमिरे, पोलीस कॉन्स्टेबल जाकीर चौधरी आणि अरुण सरदार हे पेट्रोलिंग करत होते. यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने टेंभुरर्खेड येथे छापा टाकला. सुगन झामा जाधव (वय ५५) हा दारू विक्री करताना रंगेहात सापडला. त्याच्याकडून टॅंगो देशी दारू आणि बॉबी संत्राच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
यानंतर नागेशवाडी येथे केलेल्या कारवाईत मनकाबाई मोतीराम खिल्लारे (वय ६०) हिच्या ताब्यातून तब्बल १२० देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.











Total Users : 3212656