spot_img
spot_img

लोणारमध्ये रस्ते बनले मृत्यूचे सापळे! MTDC समोरील जीवघेण्या खड्ड्यावर राष्ट्रवादीचा एल्गार; तात्काळ दुरुस्ती करा, अन्यथा रस्त्यावर उतरू!

लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) शहरातील एमटीडीसीसमोरील उतारावर पडलेल्या मोठ्या जीवघेण्या खड्ड्यामुळे वाहनचालक, पर्यटक आणि नागरिकांचा जीव धोक्यात आला असतानाही प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचा संतप्त आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सरदार वल्लभभाई पटेल शाळा तसेच मारुती पारा परिसरातही रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, प्रशासन नागरिकांच्या मृत्यूची वाट पाहत आहे का, असा जळजळीत सवाल उपस्थित करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंबादास पाटील खंड आणि शहराध्यक्ष मो. तौफिक कुरेशी यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धोकादायक खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी भीषण अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित विभागाने तात्पुरती माती किंवा खडी टाकून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू नये. सिमेंट काँक्रिट किंवा उच्च दर्जाच्या डांबरीकरणातून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र जनआंदोलन छेडेल, असा अंतिम इशारा देण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नेते भगवानराव सानप, कार्याध्यक्ष विठ्ठलजी आटोळे पाटील, शहराध्यक्ष मो. तौफिक कुरेशी, इब्राहिम सर, वितेश चव्हाण, मेराज पठाण, विनोद आघाव, संजय अंभोरे, प्रवीण देशमुख, ज्ञानेश्वर शेवाळे आणि अभिजीत सानप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“नागरिकांचा जीव सर्वांत मौल्यवान आहे. प्रशासनाने तात्काळ जागे होऊन जीवघेणे खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत; अन्यथा जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू.”
मो. तौफिक कुरेशी, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, लोणार

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!