बुलढाणा (हॅलो बुलढाणा) क्षयरोगमुक्त बुलढाण्याचे स्वप्न केवळ कागदावर न ठेवता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी स्वतः पुढाकार घेत कृतीतून मोठा संदेश दिला आहे. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला गती देण्यासाठी त्यांनी एका टीबी रुग्णाला पुढील सहा महिन्यांसाठी दत्तक घेतले असून, ‘निक्षय मित्र’ म्हणून रुग्णाच्या पोषण आहाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.
गुलाब खरात यांच्या हस्ते संबंधित रुग्णाला पौष्टिक आहाराचे किट सुपूर्द करण्यात आले. या किटमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, डाळ, खाद्यतेल तसेच दूध किंवा दूध पावडरचा समावेश असून, पुढील सहा महिने दरमहा हे किट रुग्णाला दिले जाणार आहे. टीबीवरील औषधोपचारासोबत सकस आहार अत्यंत महत्त्वाचा असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवकर भारसाकळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर खेडकर उपस्थित होते.
टीबी हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. दानशूर व्यक्ती, अधिकारी, लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि स्वयंसेवी संस्थांनी निक्षय मित्र म्हणून पुढे यावे,” असे आवाहन गुलाब खरात यांनी केले.
सीईओंच्या या संवेदनशील निर्णयाने प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांसमोरही आदर्श निर्माण झाला आहे. आता केवळ बैठका आणि भाषणांवर न थांबता समाजाने पुढे येण्याची वेळ आली असून, प्रत्येक टीबी रुग्णाला पोषण आणि मानसिक आधार मिळाल्यास ‘टीबीमुक्त बुलढाणा’ हे लक्ष्य दूर राहणार नाही.










Total Users : 2728603