spot_img
spot_img

बस बंद अन् गावांचा जिल्ह्याशी ‘संपर्क कट’! चिखली–उमरद मार्गावर विद्यार्थ्यांची फरफट; प्रवीण गीते थेट विभागीय नियंत्रकांच्या दारात!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली ते उमरद मार्गावरील एसटी बस सेवा अनेक वर्षांपासून बंद असल्याने विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, व्यापारी आणि नोकरदारांची अक्षरशः फरफट सुरू आहे. ही अन्यायकारक परिस्थिती आणखी किती दिवस सहन करायची, असा संतप्त सवाल उपस्थित करत लोकजागर परिवाराचे बुलढाणा जिल्हा मुख्य विश्वस्त प्रवीण गीते यांनी बंद बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.

गीते यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागीय नियंत्रकांना निवेदन दिले. चिखली–देऊळगाव मही–सावंगी–साठेगाव–हिवरखेड–किनगाव राजा–उमरद या मार्गावरील बस बंद असल्यामुळे ग्रामीण नागरिकांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्कच तुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खासगी वाहनांचा महागडा आणि असुरक्षित पर्याय स्वीकारावा लागत आहे. रुग्णांना उपचारासाठी वेळेत पोहोचता येत नाही, तर शेतकरी व व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

एसटी महामंडळाने ग्रामीण प्रवाशांच्या संयमाची परीक्षा न पाहता ही बस सेवा तातडीने सुरू करावी. अन्यथा नागरिकांच्या तीव्र रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!