धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा/सादिक शेख) मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे हे परिसरातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असून येथे वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी, लघुउद्योजक, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येची तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अमर राजीव कुळे यांनी केली.
यासंदर्भात महावितरण कार्यालय, मोताळा येथे उपमुख्य कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन परिसरातील नागरिकांच्या विविध वीज समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. यामध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने वीजपुरवठा, ट्रान्सफॉर्मरच्या समस्या, मीटर रीडिंगमधील त्रुटी, वीजबिलांच्या तक्रारी तसेच स्मार्ट मीटरसंदर्भातील समस्यांचा समावेश आहे.
धामणगाव बढे येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने बाजारपेठेतील व्यापारी व व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास, घरगुती कामे आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. महावितरण प्रशासनाने या समस्यांवर तातडीने उपाययोजना न केल्यास परिसरातील नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी श्री नारायण चौधरी, शिवाजी राहणे, दीपक जाधव, रामचंद्र राहणे, हर्षवर्धन राहणे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
▪️कमी वीज दाबाने उपकरणे नादुरुस्त!
यासोबतच धामणगाव बढे व परिसरात अनेकदा कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरगुती तसेच व्यावसायिक उपकरणे खराब होण्याचे प्रकार घडत आहेत. फ्रिज, टीव्ही, पंखे, मोटारी, संगणक यांसह विविध विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीजपुरवठ्याचा दाब नियमित ठेवण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात आणि उपकरणांचे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाय करावा, अशी मागणी करण्यात आली.










Total Users : 2722556