spot_img
spot_img

BIG BREAKING : जिल्हा बँकेत डॉ. राजेंद्र शिंगणेंचा पहिला ‘मास्टर स्ट्रोक’! अर्ज माघारीनंतर बिनविरोध विजय; खरी लढाई अजून बाकी…!

बुलढाणा, २८ जुलै (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत पहिला मोठा निकाल समोर आला असून, राज्याचे माजी मंत्री तथा सहकार क्षेत्रातील वजनदार नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. तब्बल १८ वर्षांनंतर होणाऱ्या जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत विजयाचे पहिले खातेच शिंगणे यांनी उघडल्याने जिल्ह्याच्या सहकार राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

प्राथमिक कृषी पतसंस्था, सिंदखेड राजा तालुका मतदारसंघातून डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधातील दत्तात्रय विनायकराव देशमुख यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर शिंगणे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला.

सहकार क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि राज्यस्तरीय राजकीय वजनामुळे शिंगणे यांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आता मात्र खरी राजकीय लढाई उर्वरित जागांवर रंगणार आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट टक्कर होणार, की पडद्यामागून नवी सहकार आघाडी आकार घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. माघारीसाठी मोठा कालावधी असल्याने अजून अनेक राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.

संचालक पदांसाठी २३ ऑगस्टला मतदान, तर २४ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे शिंगणेंच्या बिनविरोध विजयाने फक्त पहिलं पान उघडलंय; जिल्हा बँकेची खरी सत्ता कुणाच्या हाती जाणार, याचा थरार अजून बाकी आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!