spot_img
spot_img

EXCLUSIVE : सातबाऱ्यात कुणाच्या ‘हाताने’ झाला मोठा EDIT? ०.६४ हेक्टरचा पिकपेरा थेट ४.६४ हेक्टरवर! ४१ क्विंटल ज्वारी विक्रीनंतर फुटलं ‘रेकॉर्ड’चं बिंग; जांबच्या ताठेंवर बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी विक्रीसाठी सादर करण्यात आलेल्या सातबारा उताऱ्यात कथितरीत्या छेडछाड करून पिकपेरा वाढविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात समाधान लक्ष्मण ताठे (वय ५५, रा. जांब, ता. जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 336(3), 340(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीचे प्रभारी व्यवस्थापक संदीप भिमराव कांबळे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, २०२४-२५ च्या हंगामात शासकीय हमीभावाने ज्वारी विक्रीसाठी आरोपीने जांब येथील गट क्रमांक २१५ चा सातबारा संस्थेकडे सादर केला होता.

चौकशीमध्ये ऑनलाइन मूळ सातबारा आणि संस्थेकडे सादर सातबाऱ्यात मोठी तफावत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. मूळ नोंदीनुसार संबंधित गटातील पिकपेरा ०.०४ व ०.६० असा एकूण ०.६४ हेक्टर असल्याचे सांगण्यात आले; मात्र संस्थेला सादर करण्यात आलेल्या सातबाऱ्यात तोच पिकपेरा २.०४ व २.६० असा तब्बल ४.६४ हेक्टर दाखविण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, या नोंदणीच्या आधारे संबंधित व्यक्तीने संस्थेकडे सुमारे ४१ क्विंटल ज्वारीची विक्री केली. प्रकरणाची तक्रार तहसीलदार तसेच जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर चौकशीत सातबाऱ्यातील कथित फेरफार समोर आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.

शासकीय हमीभाव योजनेतच कागदपत्रांची अशी कथित ‘एडिटिंग’ करून शासनाची दिशाभूल होत असेल, तर नोंदणी आणि पडताळणी यंत्रणा नेमकी करते तरी काय? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे.प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!