मेहकर (हॅलो बुलढाणा) दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ २२ जुलै रोजी मेहकर येथे स्वाक्षरी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान आमदार सिद्धार्थ खरात यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधत केंद्र सरकारलाही चांगलेच धारेवर धरले.
“भविष्यातील राष्ट्रनिर्माते असलेल्या तरुणाईवर लाठ्या चालवल्या जात असतील, तर ही लोकशाहीसाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे,” असा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जखमा पाहून काळजाला घरे पडत असल्याचे सांगत उपस्थितांनी लाठीचार्जचा तीव्र निषेध केला.
याचवेळी आमदार सिद्धार्थ खरात चांगलेच ‘फायर’ झाले. “हा धर्मेंद्र प्रधान तुमचा बाप लागतोय का? त्याचा तत्काळ राजीनामा घेतला पाहिजे!” अशा रोखठोक शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडत केंद्र सरकारला खडे बोल सुनावले.
या आंदोलनाला नगराध्यक्ष किशोर गारोळे, युवासेना प्रमुख ॲड. आकाश घोडे, शहरप्रमुख निंबाजी पांडव, नगरसेवक महेश रिंढे, अमर घोडे, नितीन तुपे, सतीश ताजने, संदीप गवई, गोपाल गायकवाड यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










