जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ ज्ञानदेव राजनकर) कुऱ्हा-वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेत जमीन गेलेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक निर्णय झाला आहे. सन २०१३ पूर्वी जमीन संपादित झालेल्या इस्लामपूरसह हाशमपूर, गोराडा, नांवखुर्द, गौलखेड आदी गावांतील पात्र बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५ लाखांप्रमाणे तब्बल ₹२२ कोटी ७१ लाखांचे सानुग्रह अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी कुटुंबांच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे.
या प्रलंबित प्रश्नाला गती देण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले. निर्णयानंतर त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत बाधित शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.
आमदार डॉ. कुटे यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. अनेक वर्षांपासून अनुदानासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा आर्थिक आधार मिळणार असून, परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेली ही मंजुरी म्हणजे बाधित शेतकऱ्यांच्या संघर्षाचा मोठा विजय मानला जात आहे.










