बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (बीडीसीसी) २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रमाला हिरवा कंदील दिला असून, २३ ऑगस्ट रोजी मतदान तर २४ ऑगस्टला मतमोजणी आणि निकालाचा फैसला होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे आता वेगाने बदलण्याची चिन्हे आहेत.
विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी गौतम वर्धन यांनी १६ जुलै रोजी कार्यक्रम जाहीर केला. २० जुलैला अधिसूचना प्रसिद्ध होताच उमेदवारी अर्ज भरण्याची रणधुमाळी सुरू होणार असून २४ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. २५ जुलैला छाननी, तर २७ जुलैला वैध उमेदवारांची यादी जाहीर होईल.
उमेदवारी मागे घेण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत असून, त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. आवश्यकतेनुसार २३ ऑगस्टला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल.
संचालक मंडळासाठी १३ तालुकानिहाय मतदारसंघांतून प्रत्येकी एक संचालक, महिलांसाठी दोन जागा तसेच विविध राखीव प्रवर्गांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व राहणार आहे.
बीडीसीसीच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार? जुने दिग्गज गड राखणार की सहकाराच्या मैदानात नवे चेहरे मोठा उलटफेर करणार? आगामी काही दिवसांत जिल्ह्याचे राजकारण या निवडणुकीभोवती तापणार, हे निश्चित!










