spot_img
spot_img

सायंकाळ झाली… शेतात गेले अन् पुन्हा घरी परतलेच नाहीत पिता-पुत्र! कांद्याच्या चाळीतलं ‘ते’ भयावह दृश्य पाहून पारखेड सुन्न; एकाच लोखंडी अँगलला दोघांचा गळफास… दोन चिमुकल्यांच्या वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?

खामगाव (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील पारखेड गावाला हादरवून सोडणारी अत्यंत दुर्दैवी घटना १९ जुलै रोजी समोर आली. पारखेड येथील शेतकरी पिता-पुत्राने जळका भडंग शिवारातील स्वतःच्या शेतातील कांद्याच्या चाळीत लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, संतोष हरिश्चंद्र गावंडे (वय ५०, रा. पारखेड ता. खामगाव) यांची जळका भडंग शिवारात शेती आहे. रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास संतोष गावंडे आणि त्यांचा मुलगा अक्षय उर्फ विठ्ठल संतोष गावंडे (वय ३०) हे दोघे शेतातील कांद्याच्या चाळीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.

या दुहेरी आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपासातून वस्तुस्थिती समोर येणार आहे. मृत अक्षय यांच्या पश्चात दोन लहान मुले असल्याची माहिती असून, एकाच कुटुंबातील पिता-पुत्राच्या मृत्यूने पारखेड परिसरावर शोककळा पसरली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!