बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सरसकट, विना अट-विना शर्ती कर्जमुक्ती आणि हक्काचा पीकविमा या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी १५ जूनपासून सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस उजाडला आहे. पाच दिवसांपासून अन्नत्याग सुरू असल्याने तुपकरांची प्रकृती खालावत चालली असून वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. मात्र, शासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
दरम्यान, या आंदोलनाला आता निर्णायक वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून मंत्री गिरीश महाजन बुलढाण्यात दाखल झाले आहेत. गिरीश महाजन आणि रविकांत तुपकर यांच्यात होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ही चर्चा केवळ औपचारिक ठरणार की शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि पीकविम्याबाबत सरकार ठोस भूमिका घेणार, हा मोठा प्रश्न आहे.
राज्यभरातून तुपकरांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असून शेतकऱ्यांचा रोष दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहे. आता सरकार निर्णय घेते की पुन्हा आश्वासनांचीच पेरणी करते, याकडे लाखो शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.










Total Users : 3258488