बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी पीकविमा प्रश्नावर मोठी घडामोड घडली. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीकविमा रकमेसाठी ॲड. शर्वरी तुपकर यांनी शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तब्बल ५ तास ठिय्या आंदोलन केले. दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेले हे आंदोलन रात्री साडेआठच्या सुमारास, भारतीय कृषी विमा कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्याची एफआयआर हाती आल्यानंतरच मागे घेण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगाम 2024-25 अंतर्गत 5,98,597 शेतकऱ्यांना 715.27 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली होती. त्यापैकी 5,97,264 शेतकऱ्यांना 713.68 कोटींचे वाटप झाले आहे. मात्र अजूनही 1,333 शेतकऱ्यांची 1 कोटी 59 लाख रुपयांची भरपाई प्रलंबित आहे. करारानुसार ही रक्कम 30 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. तरीही कंपनीने वारंवार सूचना देऊनही रक्कम अडवून ठेवली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
ॲड. शर्वरी तुपकर यांनी “शेतकऱ्यांची रक्कम अडवणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय ठिय्या उठणार नाही,” अशी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या आक्रमक प्रश्नांपुढे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे निरुत्तर झाले आणि अखेर त्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीविरोधात फिर्याद दिली. या तक्रारीवरून कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 316(2), 318(4) नुसार बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. 518/2026 दाखल करण्यात आला आहे.
या आंदोलनादरम्यान जिल्हा कृषी कार्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरूच असून, त्यांच्या प्रकृतीतही बिघाड झाल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.शेतकऱ्यांच्या हक्काचे 1.59 कोटी अडवणाऱ्या विमा कंपनीवर केवळ गुन्हा दाखल होणार की प्रत्यक्ष अटक आणि वसुलीची कारवाईही होणार? संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे. या प्रकरणाचा तपास बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील करीत आहेत.











