spot_img
spot_img

डोणगावच्या ‘त्या’ अनधिकृत शाळेचा भांडाफोड! मान्यता नाही, तरीही चौथीपर्यंत वर्ग; पालकांची फसवणूक, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ?

डोणगाव (हॅलो बुलढाणा) डोनगाव येथील अरेगाव रोडवरील ‘स्व. धर्मवीर दिलीपराव रहाटे आदर्श विद्या मंदिर’ या कथित नामांकित खाजगी प्राथमिक शाळेचा कारभार अखेर शिक्षण विभागाच्या चौकशीत उघडा पडला आहे. शासनाची कोणतीही मान्यता नसताना, U-DISE क्रमांक नसताना आणि अधिकृत परवानगी नसताना ही शाळा केजीपासून थेट इयत्ता चौथीपर्यंत वर्ग भरवत असल्याचे चौकशी अहवालातून समोर आले आहे. गरीब पालकांकडून लाखो रुपयांची फी वसूल करून त्यांच्या मुलांच्या भविष्याशी खेळ केल्याचा गंभीर आरोप आता अधिकच ठळक झाला आहे.

रवीकांत रामभाऊ आढाव, रा. डोनगाव यांनी या बेकायदेशीर शाळेबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख डोनगाव यांच्या समितीने 21 मे 2026 रोजी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन चौकशी केली. चौकशीत शाळेकडे 2025-26 पर्यंत कोणतीही शासकीय मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले. शाळेच्या संचालिका मिना रहाटे यांनी नर्सरी ते केजी-2 पर्यंतचे वर्ग असल्याचे सांगितले; मात्र प्रत्यक्षात चौथीपर्यंतचे वर्ग सुरू असल्याचे उघड झाले.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या टीसी आणि गुणपत्रकांमध्ये मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे. कु. प्रांजल किरणआप्पा बुरुंगे या विद्यार्थिनीच्या प्रकरणातून बोगस गुणपत्रक आणि संशयास्पद टीसी प्रकरणाचा भांडाफोड झाला. ज्या विद्यार्थिनीने नागापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले, तिचे आदर्श विद्या मंदिरकडून गुणपत्रक तयार झाल्याने संपूर्ण कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

चौकशी समितीने नागापूर शाळेतील हजेरी पंजी, निकालपत्रक, दाखल-खारिज रजिस्टर तसेच डोनगाव येथील संबंधित शाळांची कागदपत्रे तपासली. मात्र आदर्श विद्या मंदिरकडून कोणतेही अधिकृत अभिलेख सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे पालकांची आर्थिक फसवणूक, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ आणि बोगस कागदपत्रांचा संशय अधिक गडद झाला आहे.

हा चौकशी अहवाल 29 मे 2026 रोजी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती मेहकर यांच्याकडे सादर करण्यात आला असून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईच्या भीतीने डोनगाव परिसरातील बोगस शिक्षणसम्राटांचे धाबे दणाणले आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!