spot_img
spot_img

झेडपी शाळेत प्रवेशासाठी ‘वासुदेव’ थेट पालकांच्या दारी!

खामगाव (हॅलो बुलढाणा) जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संदेश घराघरात पोहोचावा आणि पालकांचा झेडपी शाळांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी बुलढाणा जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे या मोहिमेचा आगळावेगळा शुभारंभ करण्यात आला.

या प्रवेशोत्सवात उपक्रमशील शिक्षक राजेश कोगदे यांनी चक्क पारंपरिक ‘वासुदेव’ वेश धारण करून गावात घरोघरी जाऊन पालकांना भावनिक आणि प्रभावी आवाहन केले. गायनाच्या माध्यमातून त्यांनी पालकांना आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्याचे आवाहन केले. या अनोख्या उपक्रमाने गावकऱ्यांचे लक्ष वेधले असून, शिक्षणासाठी लोकजागृतीचा हा प्रभावी प्रयत्न ठरला आहे.

राज्याचे शिक्षण मंत्री ना. भुसे यांनी २ जून रोजी राज्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन झेडपी शाळांच्या गुणवत्ता व पटसंख्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांची बुलढाणा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून लाखनवाडा येथील हा उपक्रम त्याच मोहिमेचा पहिला टप्पा मानला जात आहे.

या मोहिमेदरम्यान शिक्षण विभागाच्या वतीने पालक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर पूर्ण विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीची शाश्वती गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड यांनी दिली.

विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांनी नुकत्याच झालेल्या NMMS परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तसेच नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या ८० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३८ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधील आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे.

या उपक्रमासाठी लाखनवाडा येथील जि.प. मराठी, उर्दू व जि.प. हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील यांनी पालकांना आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेतच निश्चित करण्याचे आवाहन केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!