जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील जामोद ग्रामपंचायतीने राबविलेला अभ्यासिका उपक्रम आता खऱ्या अर्थाने यशाची गाथा ठरू लागला आहे. सरपंच पुत्र तथा युवा उद्योजक समाधान दामोदर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेचा पहिला मोठा निकाल समोर आला असून, येथे नियमित अभ्यास करणाऱ्या विशाल साहेबराव हातेकर याची राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) निवड झाली आहे.
या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचा जल्लोष पसरला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शांत आणि शिस्तबद्ध अभ्यासाचे वातावरण मिळावे या हेतूने सुरू केलेल्या या उपक्रमाने पहिल्याच टप्प्यात मोठे यश मिळवले आहे.
विशाल हातेकरच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही नवी ऊर्जा आणि स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. अभ्यासिकेमुळे योग्य दिशा आणि वातावरण मिळाले, त्याचाच हा परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, ग्रामीण भागात अशा सुविधा वाढल्या तर अनेक ‘विशाल’ घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.समाधान दामोदर यांनीही आनंद व्यक्त करत, हा उपक्रम गावातील युवकांचे भविष्य घडवणारा ठरेल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.










