spot_img
spot_img

शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या …अन्यथा शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सामोरे जाल : रविकांत तुपकरांचा कडक इशारा – शेतीमशागतीसाठी डिझेल उपलब्ध करून देण्याची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी , जिल्हाधिकाऱ्यांना शिष्ट मंडळाचे निवेदन

बुलढाणा, दि.19 (हॅलो बुलडाणा) सध्या राज्यात आणि जिल्ह्यात इंधन आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुख्यत्वे डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने शेतीकामासाठी तातडीने डिझेलची व्यवस्था करावी तसेच ट्रॅक्टर मालक व शेतकऱ्यांना कॅन मध्ये डिझेल पेट्रोल देण्याची देखील सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.आवश्यक ते इंधन उपलब्ध न करून दिल्यास सरकारला शेतकऱ्यांचा तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा गंभीर इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात रविकांत तुपकर यांनी नमूद केले आहे की, शेतीच्या हंगामी कामांसाठी ट्रॅक्टर, पंप, अवजारे व इतर यंत्रसामग्रीसाठी डिझेल अत्यंत आवश्यक असते, परंतु सध्या पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा, उपलब्ध नाही. व काही पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध झाल्यास ट्रॅक्टरमध्ये मर्यादित प्रमाणात डिझेल दिले जात आहे तसेच कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची नांगरणी, पेरणी, फवारणी, मशागत तसेच इतर शेतीची महत्त्वाची कामे वेळेवर होत नसून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. आधीच नैसर्गिक संकटे आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांच्या समस्या अधिक गंभीर होत आहेत. शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास यावर्षीचा हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, पेरण्या देखील कोळंबू शकतात त्यामुळे सरकारने या समस्येकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांनी केली आहे.

कॅन मध्ये डिझेल देण्याची व्यवस्था करावी
शेती मशागतीची सर्व कामे ट्रॅक्टर द्वारे केले जातात तसेच शेतातील काही कामे इतर यंत्र सामग्री नाही करावी लागतात पण हे सर्व यंत्रसामग्री वारंवार पेट्रोल पंपावर घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कॅन मध्ये इंधन घेऊन शेतीच्या बांधावर पोहोचावे लागते, ही परिस्थिती पाहता कॅनमध्ये डिझेल देण्याबाबतही आवश्यक निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांना डिझेल – पेट्रोल देण्यात दिरंगाई केल्यास शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे. उपरोक्त मागणी मान्य न झाल्यास शेतकऱ्यांना घेऊन आक्रमक आंदोलन उभे करू, होण्याऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिला आहे.जिल्हाधिकाऱ्यांना ‘क्रांतिकारी’ च्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी संघटनेचे नेते अमोल मोरे, महेंद्र जाधव, भागवत धोरण, मुकुंदा शिंबरे, सुरेश पवार, पवन काकडे, हरिभाऊ उबरहन्डे, छत्रुघ्न तुपकर, रवींद्र गवई, विजय गायकवाड, कैलास उतपुरे यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!