मेहकर (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील नागेशवाडी येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर ग्रामीण रुग्णालयाला भेट देत दाखल रुग्णांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
सध्या मेहकर ग्रामीण रुग्णालयात 18 तर जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात 26 रुग्णांवर उपचार सुरू असून आरोग्य विभागाची टीम गावात दाखल झाली आहे. संबंधित डॉक्टर गवस यांच्याशी चर्चा करत उपचार व्यवस्था, औषधसाठा आणि आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
दूषित पाण्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही. कुठल्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशारा आमदार खरात यांनी प्रशासनाला दिला. प्रत्येक रुग्णाला वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
या पाहणीदरम्यान नगराध्यक्ष किशोर गारोळे, अॅड. आकाश घोडे, उमेश चनखोरे, अॅड. संदीप गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











