लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) प्रशासनाने ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत लोणार तालुक्यातील बीबी येथे आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” मोठ्या उत्साहात पार पाडले. आनंद मंगल कार्यालयात पार पडलेल्या या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांचा लाभ घेतला.
महसूल विभागाने तब्बल १४६ प्रकरणांचा निपटारा करत सातबारा, फेरफार, उत्पन्न, रहिवासी व मृत्यू दाखल्यांचे वितरण केले. पुरवठा, महिला व बालविकास, ग्रामविकास तसेच सेतू व आधार केंद्रांनीही शेकडो प्रकरणे मार्गी लावली. विशेष म्हणजे संजय गांधी निराधार योजनेसाठी ३५ अर्ज स्वीकारण्यात आले.
या शिबिराचे मुख्य आकर्षण ठरले ते घरकुल लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या रेती पावत्या. तब्बल १९७ कुटुंबांना ९८३ ब्रास रेतीच्या पावत्या मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहताना दिसले.
तहसीलदार भूषण पाटील यांनी प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगत, प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रशासनाच्या या थेट कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अशा शिबिरांची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.











