मेहकर (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) तालुक्यातील मोहना खुर्द येथे बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच रात्री वासरू आणि शेळीचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या कारभारावरही संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहना खुर्द शिवारातील जनुना व शेंदला परिसरात भीमराव सरदार यांचे शेत आहे. मंगळवार (१० मार्च) रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या शेतात प्रवेश केला. गोठ्यात बांधलेल्या वासराला आणि शेळीला लक्ष्य करत बिबट्याने दोन्ही प्राण्यांचा जागीच फडशा पाडला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेमुळे मोहना खुर्दसह आसपासच्या शेतशिवारात प्रचंड दहशत पसरली आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी किंवा रखवालीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना आता जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, परिसरात त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.












