बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्याच्या अस्मितेशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या मागणीला आता राजकीय जोर मिळताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वराज्य जननी जिजाबाई यांचे नाव देण्याची ठाम मागणी केली आहे.
जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचे आजोळ आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान म्हणून संपूर्ण देशभर ओळखले जाते. अशा ऐतिहासिक आणि गौरवशाली भूमीत उभे राहणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जिजाऊंचे नाव देणे ही केवळ नामकरणाची बाब नसून जिल्ह्याच्या इतिहासाचा आणि स्वाभिमानाचा सन्मान असल्याचे प्रतापराव जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे.
जिल्ह्यातील जनतेचीही हीच भावना असून “राष्ट्रमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा” असे नाव देऊन जिजाऊंच्या कार्याला अभिवादन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनभावनेचा आदर करून या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षाही खा.जाधव यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ही मागणी मान्य झाल्यास बुलढाणा जिल्ह्यासाठी तो ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण ठरणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.












