spot_img
spot_img

💥EXCLUSIVE ५५ वर्षांनी भेटला हरवलेला भाऊ; खामगावात माणुसकीचा चमत्कार! रुग्णालयातील कर्मचाऱ्यामुळे जुळले तुटलेले नाते; डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘भाऊ’! व्हिडिओ कॉलवर दिसला चेहरा…आणि………

खामगाव (हॅलो बुलडाणा) नियती कधी कोणते वळण देईल, सांगता येत नाही. तब्बल ५५ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला भाऊ पुन्हा कुटुंबाला भेटेल, अशी आशाही ज्यांनी सोडून दिली होती, त्या कुटुंबासाठी खामगाव येथे घडलेली ही घटना एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी ठरली आहे.

केरळ राज्यातील त्रिचूर जिल्ह्यातील एका गावातील हा व्यक्ती वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी घरातील वादामुळे घर सोडून निघून गेला. आयुष्यभर मिळेल ते काम करत त्याने कष्टाची कमाई स्वतःवर न खर्चता अनाथाश्रमांना दान केली. परक्यांसाठी जगणारा हा माणूस मात्र आपल्या नात्यांपासून दूरच राहिला. वय वाढले, शरीर थकले आणि एकटेपण बोचू लागले.

अस्वस्थ मनःस्थितीत तो केरळहून चेन्नई, तेथून नागपूर आणि पुढे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेत बसला. दरम्यान नांदुरा स्थानकाजवळ त्याने चालत्या गाडीतून उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रेल्वे पोलिसांनी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.

४ फेब्रुवारी २०२६ पासून उपचार सुरू होते; मात्र तो अनोळखी असल्याने ओळख पटत नव्हती. पाच दिवसांनी शुद्धीवर आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी रमेश अवचार यांनी आस्थेने संवाद साधत त्याची माहिती जाणून घेतली. मिळालेल्या धाग्यांवरून नातेवाईकांचा शोध घेत व्हिडिओ कॉलद्वारे ओळख पटवण्यात आली. स्क्रीनवर चेहरा दिसताच समोरील व्यक्तीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले “हा माझाच भाऊ आहे,” असा भावनिक उद्गार त्यांनी काढला.

क्षणाचाही विलंब न करता कुटुंबीय खामगावकडे रवाना झाले. ५५ वर्षांनी भावाची भेट घडवून आणणाऱ्या रमेश अवचार यांच्या संवेदनशीलतेमुळे केवळ एका रुग्णाचे प्राणच वाचले नाहीत, तर तुटलेले नातेही पुन्हा जुळले. माणुसकीचा हा दीप खामगावात अधिक तेजाने प्रज्वलित झाला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!