खामगाव (हॅलो बुलडाणा) खामगाव तालुक्यातील सजनपुरी ग्रामपंचायतीने यंदा १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी न केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून ग्रामस्थ आणि ‘सकल हिंदू समाज’ आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये शिवजयंती साजरी करणे बंधनकारक असताना ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रार अर्जातून करण्यात आला आहे.
या प्रकरणी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून सरपंच व ग्रामसेवकांवर नियमानुसार कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शासनाचा निधी उपलब्ध असतानाही जयंती का साजरी करण्यात आली नाही, याचा लेखी खुलासा तात्काळ मागवावा, अशी मागणी तक्रारीत नमूद आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व प्रेरणास्थान मानले जातात. ग्रामपंचायतीसारख्या जबाबदार संस्थेकडून शासकीय आदेशाचे पालन न होणे आणि शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जाणे ही अत्यंत संतापजनक बाब असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती साजरी न केल्याचे फोटो पुराव्यादाखल जोडण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे. जर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर ‘सकल हिंदू समाज’ व समस्त शिवभक्तांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











