जानेफळ (हॅलो बुलडाणा) मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस ठाणे हद्दीत अपहरण करून निर्घृण खून करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत देशभर वावर करणारा अमोल जयसिंग राजपूत (वय ३८, रा. जानेफळ) याला स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. ही कारवाई म्हणजे गुन्हेगारी जगताला दिलेला थेट इशाराच आहे.
फिर्यादी सौ. ज्योती दिलीप इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ जून २०२४ रोजी त्यांच्या पती दिलीप इंगळे यांचे अपहरण करून त्यांना अहमदनगर येथे नेण्यात आले. आरोपी अमोल राजपूत व त्याच्या साथीदारांनी संगनमताने या घटनेनंतर दिलीप इंगळे यांचा निर्घृण खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत असून, मुख्य सूत्रधार मात्र फरार होता.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर फरार गुन्हेगारांविरोधात कडक धोरण अवलंबले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना देत तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबविण्यात आली. अमोल राजपूत हा वेशभूषा बदलून छत्तीसगड, चंदीगड, कर्नाटक, दिल्ली आदी राज्यांत लपून राहत होता. मात्र तंत्रज्ञान आणि पोलिसांच्या बुद्धीकौशल्यापुढे त्याचे डाव अपयशी ठरले.
२७ डिसेंबर २०२५ रोजी तो चंदीगडहून छत्रपती संभाजीनगर येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. अखेर ६ जानेवारी २०२६ रोजी ‘हॉटेल राधिका इन’ येथून त्याला अटक करण्यात आली.
पोलीस कामगिरीचे श्रेय
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा.श्री निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री. श्रेणीक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री.अमोल गायकवाड यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक श्री. सुनिल अंबुलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाचे पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकों दिपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, गजानन गोरले, मपोकों आशा मोरे, चापोकों निवुत्ती पूड व टेक्नीकल अॅनालेसीस विंगचे पोहेकों राजु आडवे, ऋषीकेश खंडेराव, कैलास ठोंबरे पवन मखमले यांनी केली आहे.












