लोणार (हॅलो बुलडाणा) मंठा तालुक्यातील टाकळखोपा गावात सर्रास अवैध वाळू उपसा व विक्री होत असून,वाळूचे टिप्पर सुसाट धावताहेत.दररोज शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत असून,शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडत आहे.
पुर्णा नदीकाठच्या या वाळू उपशाच्या अवैध धंद्याला महसूल यंत्रणेची छुपी साथ असल्याचाआरोप होत आहे. क्रेनद्वारे नदीतून थेट वाळू उपसा होत असून चार जिल्ह्यांत विक्री वाळू विक्री होते.
जालना व हिंगोली जिल्ह्यातील सिमेलगतचा देवठाणा- खोरवड- बन या गावच्या हद्दीतून क्रेन द्वारे पुर्णा नदीपात्रातून थेट वाळू उपसा करून ती लोणार जि.बुलढाणा, जिंतूर जि.परभणी, रिसोड जि.वाशिम व सेनगाव जि.हिंगोली या ठिकाणच्या बांधकाम ठिकाणी चढ्या दराने विकली जाते. दरम्यान वाळू वाहतुकीच्या वाहनांमुळे तळणीसह परिसरातील कानडी- देवठाणा- बन , उस्वद- नरडोह – मंठा , कानडी- तळणी , शिरपूर- कोकरबा- वडगाव , वाघाळा- टाकळखोपा- इंचा- पुर्णा पाटी, किर्ला- दुधा , उस्वद- हनवतखेडा- गारटेकी , भुवन- वझर सरकटे- बैलोरा चौफुली या ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे.वाघाळा- टाकळखोपा- इंचा मुख्य रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी विद्रूप झाला आहे.
▪️घरकुल लाभार्थीही वंचित
राज्य शासनाने घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात केवळ १० टक्के लाभार्थ्यांनाच वाळू मिळाली असून उर्वरित ९० टक्के लाभार्थी अद्याप वाळू मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शासकीय कामे आणि घरकुल योजनेच्या नावाखालीही वाळूची सर्रास अवैध वाहतूक सुरू असल्याचा आरोप आहे.
▪️या गावात अवैध वाळू वाहतूक
पुर्णा नदीकाठच्या बन – खोरवड , उस्वद , हनवतखेडा – लिंबखेडा , टाकळखोपा, किर्ला , पोखरी केंधळे, भुवन व वझर सरकटे या गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. महसूल विभागातील अधिकारी या संपूर्ण प्रकरणात एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी टाळण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासन गांभीर्याने काम करत नाही हे स्पष्ट दिसून येत आहे.
▪️शासनाच्या मोफत वाळू योजनेला हरताळ – ज्ञानेश्वर सरकटे
शासनाच्या मोफत वाळू योजनेला हरताळ फासला जात असून स्थानिक प्रशासन, पोलीस आणि राजकीय नेत्यांची मिलीभगत उघड झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी उबाठाचे तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे यांनी केली आहे.