डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) डोणगाव ते आरेगाव दरम्यानचा रस्ता दोन वर्षांपासून पूर्णत्वास येऊ शकलेला नाही. रस्त्याचे काम सुरू करून ठेकेदाराने तो अर्धवट सोडला. गिट्टी टाकून काम थांबवण्यात आले, मात्र वेळेअगोदरच गिट्टी निघून मोठमोठाले खड्डे निर्माण झाले आहेत. रस्ता चिखलमय झाल्याने वाहनचालक आणि पादचारी यांचे प्रचंड हाल होत आहेत.हा रस्ता रिसोडला जाण्यासाठी शॉर्टकट मानला जातो, मात्र सध्या त्याची अवस्था “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” अशीच झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा यामुळे दोन वर्षे उलटली तरी कामाची साधी सुरुवातही झालेली नाही.या रस्त्यावरून दररोज गजानन महाराज मंदिर, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकार विद्या मंदिर, आदर्श विद्या मंदिर येथे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धूळ यामुळे प्रवास जीवघेणा ठरत आहे.
ठेकेदाराने काम सोडून पोबारा का केला? सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे लक्ष दिले जात नाही का? दोन वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण न झाल्यास नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे आवाज आता बुलंद होऊ लागले आहेत.