बुलढाणा (हॅलो बुलडाणा) उन्हाचे चटके तीव्र होऊ लागल्याने याचा जिल्ह्यातील जल स्त्रोतांवर परिणाम दिसून येत आहे. लघु प्रकल्पातील जलपातळी खालावत चालल्यामुळे अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात सध्या 38 ते 40 टक्के पाणीसाठा शिल्लक असून,नगर पालिकेद्वारे पाणीपुरवठा नियमित होत नसल्याचा आरोप तत्पूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. दरम्यान जिल्ह्यात 38 टँकरने पाणीपुरवठा केला जात असुन उपाययोजनांची गरज आहे.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत जिल्ह्यातील बहुतांश गावांना पाणी पुरविल्या जाते.मोठ्या व मध्यम धरणात सध्या समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे.त्यामुळे मे महिन्यापर्यंत पाणी राहण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. मात्र लघु प्रकल्पांमध्ये जलपातळी खालवल्याने पाणी प्रश्न बिकट होत आहे. परिणामी उपाय योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक ठरत आहे. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.आतापर्यंत काही कामे पूर्णत्वास गेली असून,जिल्ह्यात 38 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.तसेच ज्या गावात भीषण पाणी टंचाई आहे तेथे विहीर, बोअरवेल अधिग्रहण करून पाणी पुरवठा केला जात आहे.
▪️जलप्रकल्पांवर दृष्टीक्षेप..
खडकपूर्णाची एकुण क्षमता 160.61 असून सध्या 59.67 इतका साठा आहे. नळगंगा प्रकल्पाची क्षमता 71.86 असून यामध्ये 39.59 साठा आहे. पेनटाकळी प्रकल्पाची क्षमता 67.86 असून यामध्ये 28.6 एवढा जलसाठा आहे.