बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चित्रपट सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणारे असावेत ही वृत्ती अत्यंत कमी प्रमाणात दिसते.परंतु अभिता फिल्म प्रोडक्शन कंपनीचे सीईओ तथा चित्रपट निर्माते सुनील शेळके यांनी प्रबोधनात्मक चित्रपट निर्मितीतून ‘मिणमिणत्या पणतीच्या’ का होईना प्रकाशाचे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या याच प्रभावी कार्याचा गौरव म्हणून त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी व कोकण रेल्वेसाठी प्रस्ताव मांडणारे भंडारी समाजाचे मानबिंदू लोकहितवादी रावबहाद्दूर सी.के.बोले यांच्या नावे देण्यात येत असलेला प्रतिष्ठित लोकहितवादी रावबहाद्दूर सी. के. बोले समाजभूषण पुरस्कार 2024 घोषित झाला आहे.
चित्रपट निर्माते सुनील शेळके यांच्या विधायक वृत्तीमुळे चित्रपटातून समाज सुसंवादीत्व, समाजऐक्य प्रसारित होऊन जातींमधील संघर्ष कमी करणे, असमानता, अस्पृश्यता अशा तेव्हाच्या समाजाच्या त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवले जाण्याचे कार्य होत आहे. याच कार्याचा गौरव म्हणून कलाक्षेत्रातील समाजप्रबोधनासाठी शाहू -फुले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचे समाज सुधारक, लोकहितवादी रावबहाद्दूर सी. के. बोले यांची 29 जून रोजी 155 वी जयंतीचे औचित्य साधून तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने शेळके यांना पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार प्रतिष्ठेचा असून, विविध क्षेत्रात प्रबोधनात्मक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण भंडारी मंडळ सभागृह, दादर(पश्चिम) मुंबई येथे 29 जून रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे आयोजक संतोष आंबेकर यांनी दिली. दरम्यान चित्रपट निर्माते सुनील शेळके यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन व स्वागत होत आहे.