मुंबई (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. आज १५ ऑक्टोबर रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात आता आचारसंहिता लागू झाली आहे. पण आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?
आचारसंहिता म्हणजे काय?
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भारतात निवडणुका घेतल्या जातात. या निवडणुका कोणत्याही पक्षपाताशिवाय होण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. निष्पक्षपातीपणे निवडणूक होण्यासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासह, राजकीय पक्षांनाही काही नियम पाळावे लागतात. हेच नियम म्हणजे आचारसंहिता असते.
आचरसंहितेमध्ये कशावर बंदी?
निवडणूक आयोग पक्ष आणि उमदेवारांवर लक्ष ठेवून असते. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचं कोणीही पक्ष किंवा उमेदवाराने उल्लंघन केल्यास त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्याला निवडणूक लढण्यासाठीही बंदी घालण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे असतो. आचारसंहितेमध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवारांचं वर्तन, निवडणूक सभा, रॅली, मिरवणुका आणि रोड शो, मतदानाच्या दिवशी पक्ष आणि उमेदवारांचं आचरण, मतदान केंद्राची शिस्त, निरीक्षक आणि सत्ताधारी पक्षाची भूमिका यांचा उल्लेख आहे.