बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आपल्या न्यायीक मागण्या रेटत राज्यातील अनेक नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.दरम्यान नागरिकांना होणाऱ्या त्रासाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारणीभूत राहतील,असेही स्पष्टीकरण संपकऱ्यांनी दिले.बुलढाणा नगरपालिकेचा संप उद्यापासून सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागातील महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकाऱ्यांना शासनाच्या अधिनियमानुसार राज्य शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा दिलेला आहे. त्यास नगर विकास विभागाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे. त्यानुसार सदर अधिकाऱ्यांना सेवार्थ आयडी देणे बाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे गेला असता वित्त विभागाने सदर अधिकारी शासकीय कर्मचारी नसल्याबाबतची तृटी काढून राज्यातील अंदाजे 3000 संवर्ग अधिकाऱ्यांना सेवार्थ आयडी पासून वंचित ठेवले आहे. तसेच अधिकाऱ्यांपैकी बरेच अधिकारी 2010- 2012 पासून कार्यरत असून अद्याप पर्यंत त्यांना जुनी पेन्शन,नवी पेन्शन यापैकी कुठल्याही पेन्शन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. याच सोबत नगरपरिषदचे स्थानिक कर्मचारी यांना सुद्धा पेन्शन लागू नाही. यामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबांचे भवितव्य अंधकारात असल्यामुळे महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने बेमुदत संपावर जाण्याचा पवित्रा घेतला आहे. या संपामध्ये आत्यावश्यक सेवा देणारी यंत्रणा सुद्धा सहभागी झाली आहे. त्यामुळे, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा स्ट्रीट लाईट व स्वच्छता मोहीम पूर्णतः बंद आदी सर्व सेवा ठप्प झाल्यात.राज्यात अनेक नगरपालिकांनी हा संप आजपासून पुकारला असून उद्या बुलढाणा नगरपालिका अधिकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत.