बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काल नेहमी प्रमाणे शनिवार-रविवार छत्रपती संभाजीनगरला जाण्याचा प्लॅनिंग ठरलं होतं पण अचानक महाराष्ट्र बंद ची बातमी आली, आपोआपच जाणं कॅन्सल झालं, मुलांच्या मागणीनुसार सकाळी मसाला डोसा चा प्लॅन ठरवलेला होता
मागच्या ५-६ महिन्यांपासून असं झालं की एकही सुट्टी आम्ही सुट्टी सारखी enjoy केली नाही..मग आम्ही रात्री ठरवलं उद्या मस्तपैकी उशिरापर्यंत झोपायचं,उठून छानपैकी डोस्यावर ताव मारायचा .. दिवसाच काहीच प्लॅनिंग करायचं नाही..जसा आला तसा स्विकारायचा ..
ठरलं तर खरी, पण उशिरा उठण रक्तातच नसल्याने ६ ला जाग आली, प्रथेप्रमाणे आधी भ्रमणध्वनीचे दर्शन घेतले..तर कळाले की बंद कॅन्सल झाला ..आता पुन्हा प्लॅन बदलावा का असा विचार करत असताना डोशाचं पीठ डोळ्यासमोर आलं..
मग म्हटलं आज काही झालं तरी सुट्टी निवांत घालवायची,मग एका हातात वर्तमानपत्र आणि एका हातात चहाचा कप असे सुखाचे चार क्षण अनुभवताच ..नवरोबाचा फोन वाजला ७.३० ला , आणि संभाषणावरून कळलं यांना लगेचच कुठेतरी निघायचा आहे..मला वाटलं नेहमीप्रमाणे emergency patient असेल..पण पुढच्याच क्षणी फर्मान निघालं की,
” शुन्य मिनिटांत तयार होऊन (अरे सॉरी तयार होण्याची पण परवानगी नव्हती )खाली या .. मुलं तर बिचारी गाढ झोपेत होती..
पण एकदा फर्मान निघाले की त्यापुढे काही चालतं नाही..७.३५ ला आमची गाडी रस्त्याला लागली होती..आता आम्ही विचारू शकत होतो की कुठे आणि का चाललो आहे..
मिळालेली माहिती अशी की
,”सकाळच्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या सफारीत योगेशला शिकार करणारा बिबट गवसला, आणि आपल्याला विकास पवारने (दोघेही ज्ञानगंगा अभयारण्यातील कर्मचारी) लगेचच फोन करून ते कळवलं आणि आपण आता ते बघायला जात आहोत.. वाऱ्याच्या वेगाने की काय म्हणतात तसं आम्ही सफारी गेट पर्यंत पोहोचलो तोपर्यंत ज्ञानगंगा अभयारण्यातील गाईड निवृत्ती गवळी आणि ड्रायव्हर राजु कांडेलकर यांनी सफारीची गाडी सुद्धा तयारच ठेवली होती, पटकन पावती घेऊन आम्ही अगदी युद्धावर निघण्यासारखं चपळाईने सज्ज झालो.. आम्हाला खूप उत्सुकता लागली होती कारण आमची आणि बिबट्याची भेट होऊन वर्ष उलटलं होतं..
सफारी सुरू झाल्यावर दहा-पंधरा मिनिटातच समोर दिसलं राजबिंडं, विजयी मुद्रेचं पण थकलेलं जनावर वाघरू .. आपल्या शिकारीचा रक्षण करत बसलेलं.. काही क्षण त्याने नजर रोखून आमच्याकडे पाहिलं, पण थोड्याच वेळात त्याला कळलं की त्याच्या शिकारीत आम्हाला काही रस नाही मग तो निवांत झाला, पाच-दहा मिनिट मस्त फोटो सेशन करून घेतलं त्याने, वेगवेगळ्या पोज दिल्या, आपल्या शिकारीच्या भोवती रॅम्पवॉकही केला .. त्यालाही भारी वाटत असेल की त्याचं कर्तृत्व बघायला कोणीतरी आलं आहे.. त्याला माणसाइतकं फोटोचं क्रेझ नसल्यामुळे तो लवकरच बोअर झाला..व आत निघून गेला, मग आम्ही पण पुढे गेलो थोडंसं थांबलो.. तर ते बिबटं पुन्हा एकदा बाहेर आलं. आणि आता त्याने पुन्हा फोटोसेशन करून घ्यायचं ठरवलं होतं परंतु नवीन पोझ मध्ये.. आता आम्ही आधीच्या लोकेशन पेक्षा विरुद्ध दिशेने होतो पण त्याने बरोबर पुन्हा कॅमेराकडे बघून पोझ् दिल्या (काळाचा महिमा, बाकी काय..) अगदीच घाई -घाईत निघाल्यामुळे क्षितिजचा कॅमेरा सोबत नव्हता.. मग त्याने दुर्बिन मधून फोकस करून त्याला मोबाईल लावून व्हिडिओ काढले ..आम्हाला कंटाळा येईपर्यंत बिबट्याने फोटो काढू दिले..
आम्हाला खरच वाटत नव्हते की आपण न ठरवता असं काही बघायला भेटलं, आणि गंमत म्हणजे आता आम्ही चौथ्यांदा बिबट पाहिला आणि त्या प्रत्येक वेळेस आम्ही चौघेही सोबत होतो.. इतर कित्येक वेळेस आम्ही वेगवेगळ्या सफारी केल्या तर काही हाती आले नाही..पण आम्ही सोबत केलेल्या प्रत्येक वेळेस काही ना काही नक्कीच गवसले आहे..(आता मी हे लिहीत असताना सुद्धा माझा नवरा पुन्हा एकदा त्याच बिबट्याच्या मागावर केला आहे..पण मला विश्वास आहे की त्याला काही दिसणार नाही)..
कारण हा निव्वळ योगायोग असेल का ..
आम्ही चौघांनी सोबत सफारीला जाण्यासाठी आज नेमका महाराष्ट्र बंद असणं, बरं तो कॅन्सल झाला तर डोशासाठी मी माझं जाणं कॅन्सल करणं, रोज फोटोग्राफी ला सकाळीच बाहेर पडणारा नवरा नेमका त्यावेळी घरातच असणं.. आणि अजून बरेच छोटे-मोठे योग..
गंमत ह्याची वाटते की आम्ही जे काही ठरवलं होतं त्यात बिबट्या किंवा सफारी कुठेच नव्हतं.
कधी -कधी वाटतं आयुष्याचही असंच असतं ना आपण झोपेसारख्या क्षणिक सुखाचं नियोजन करतो पण विधात्याने आपल्यासाठी काहीतरी अलौकिक प्लॅन केलेलं असतं…
फक्त गरजेचं असतं की आपण त्याच्या नियोजनावर विश्वास ठेवणं आणि त्याला स्वीकारणं..