शेगाव (हॅलो बुलढाणा) एसटी महामंडळाच्या धावत्या शिवशाही बसला अचानक आग लागल्याची घटना खामगाव अकोला मार्गावर रिधोरा जवळ गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेत शिवशाही बस संपूर्ण जळून खाक झाली. ही बस 44 प्रवासी घेऊन जात होती.
शेगाव येथून अकोलाकडे जाणाऱ्या शिवशाही या स्लीपर कोच बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती बस चालकाने दिली आहे. गुरुवारी साडे बारा वाजताच्या सुमारास ही बस अकोलाकडे जात असताना रिधोरा परीसरातील अशोक लेलँड वर्कशॉप जवळ बसच्या इंजीनमधून धूर निघत असल्याची बाब चालकाच्या लक्षात आली.चालकाने बस थांबवत बस मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर आग विझविण्यासाठी बस मधील सिलेंडरचा वापर केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. मात्र बंब येईपर्यंत बस खाक झाली हाेती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीत एसटी महामंडळाचे खुप मोठे नुकसान झाले आहे.