जलंब (हॅलो बुलढाणा) मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा आणून विक्रीसाठी नेला जात असल्याची गुप्त माहिती मिळताच अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाने आणि जलंब पोलिसांनी माटरगाव ते भास्तन मार्गावरील महालक्ष्मी कृषी तंत्रज्ञान महाविद्यालय येथे नाकाबंदी करून तब्बल ५५ लाख ५७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती पथक प्रमुख निलेश देशमुख यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा चारचाकी वाहनातून बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत आणून विक्री केली जाणार आहे.
या माहितीवरून जळंबचे ठाणेदार सचिन पाटील व स्टाफ यांनी माटरगाव ते भास्तन मार्गावर महालक्ष्मी कृषी तंत्रज्ञान महाविद्यालया
जवळ दबा धरला. दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी दोन संशयित वाहने आढळून आली.
पोलिसांनी बोलेरो पिकअप वाहन क्र. MH28-BB-7491 आणि MH-56-C-0501 अडवून तपासणी केली असता, त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला.
संजय गव्हादे, वय २९, रा. शेंकर नगर, खामगाव,
सुरेंद्र जानराव तापडे, वय ३६, रा. भिमनगर, जळगाव जामोद असे आरोपींची नाव आहे.
या दोघांविरुद्ध जळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २७४, २७५, २२३, १२३(३)(५) सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ५९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींकडून गुटखा व पान मसाला किंमत ३४,५७,१०० रु. व २ वाहने किंमत २१,००,००० रु. असा एकूण ५५,५७,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई सपोनि निलेश देशमुख, पोहवा अब्दुल माजीद, पोहवा एजाज अहमद, पोको मोहम्मद अमीर तसेच जलंबचे ठाणेदार सपोनि सचिन पाटील, पोहवा होनमाने, पोको गायकवाड, पोको शिंगारे, पोको काकडे, पोको गाडेकर यांनी केली.माटरगाव-भास्तन मार्गावरील या मोठ्या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.













Total Users : 3807428