चिखली (हॅलो बुलढाणा) पाण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असताना खडकपूर्णा प्रकल्पातून वाहून जाणाऱ्या पाण्याला अटकाव करणार कोण? संत चोखासागर अर्थात खडकपूर्णा प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प असतानाही दोन महिन्यांपासून गळती सुरू असल्याची तक्रार समोर आली आहे. दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा स्थानिकांचा दावा असून, संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पेनटाकळीच्या पाणीवाटपावरून उपोषणे झाली, आंदोलने पेटली आणि लोकप्रतिनिधींमध्ये संघर्षही रंगला. अखेर मध्यस्थीनंतर पाणी सोडण्यात आले. मात्र, खडकपूर्णातून सुरू असलेल्या पाण्याच्या अपव्ययाकडे तितक्याच गांभीर्याने लक्ष कधी दिले जाणार? पाणी सोडण्यासाठी आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी पाणी वाचवण्यासाठी पुढाकार घेणार का?
यंदा अपेक्षित पाण्याची आवक न झाल्याने खडकपूर्णातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. उपलब्ध साठा जपण्याची गरज असताना सुरू असलेली गळती म्हणजे नियोजनावरच प्रश्नचिन्ह आहे. गळती नेमकी कुठून होते, तिचे प्रमाण किती आणि दुरुस्ती का रखडली, याचा स्पष्ट खुलासा संबंधित विभागाने करणे आवश्यक आहे.
परिसरातील शेतकरी तूर, हळद, आले आणि ऊस वाचवण्यासाठी पाण्याची जुळवाजुळव करीत आहेत. गावांना पिण्याचे पाणी आणि जनावरांची तहान भागवण्याचे आव्हानही समोर आहे. अशावेळी पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा असताना हा अपव्यय सुरू राहणे संतापजनक आहे.
प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून गळतीचे कारण शोधावे, कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि कार्यवाहीची माहिती जाहीर करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. केवळ पाहणीचा सोपस्कार करून प्रश्न मिटणार नाही; गळती प्रत्यक्ष बंद होणे गरजेचे आहे.
गळतीचे मोजमाप, दुरुस्तीची मुदत आणि जबाबदार अधिकाऱ्यांची माहिती नागरिकांसमोर यायला हवी. आज वाया जाणारे पाणी उद्याच्या टंचाईत परत मिळणार नाही. त्यामुळे या प्रश्नाला कागदी आश्वासनांपलीकडे नेऊन तातडीची कृती दाखवण्याची गरज आहे













Total Users : 3807428