spot_img
spot_img

BIG BREAKING! शेतात गोठा… गोठ्यात मशीन… अन् मशीनमागे दडलं होतं भयंकर गुपित! अकोल्याच्या धडाकेबाज उपसंचालक डॉ. आरती कुलवाल मॅडम आणि बुलढाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली असा सापळा की बोगस डॉक्टरसह तिघांचा खेळ खल्लास!

अमडापूर (हॅलो बुलढाणा) गर्भलिंग निदानाच्या अवैध धंद्याचा धक्कादायक पर्दाफाश! ना रुग्णालय, ना अधिकृत सोनोग्राफी सेंटर! थेट शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने सुरू असलेला गर्भलिंग निदानाचा काळाबाजार पीसीपीएनडीटी विभागाने उद्ध्वस्त केला! अकोला, वाशिम आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या संयुक्त पथकाने शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी अमडापूर-लव्हाळा मार्गावर धडक कारवाई करत बोगस डॉक्टर, वाशिमचा एजंट आणि आणखी एका साथीदाराला रंगेहात पकडले.

विविध ठिकाणी फिरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान केले जात असल्याची गोपनीय माहिती विभागाला मिळाली होती. त्यानंतर उपसंचालक डॉ. आरती कुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला.

सकाळी सहा वाजल्यापासून पथक संशयितांच्या मागावर होते. अखेर गणेश शंकरराव सूर्यवंशी यांच्या शेतातील पत्र्याच्या गोठ्यात बनावट ग्राहकाची सोनोग्राफी सुरू होताच दुपारी दोन वाजता पथकाने छापा टाकला. संशयितांना रंगेहात पकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.

सायंकाळी सहा वाजता उपजिल्हा रुग्णालय चिखलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमर सय्यद यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या कारवाईसाठी डॉ. दत्तात्रय बिराजदार, डॉ. अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उमर सय्यद, डॉ. अनुप चौधरी, डॉ. सोनाली तायडे, डॉ. राहुल डोंगरे, डॉ. उमेश सावजी, विधी समुपदेशक शुभांगी ठाकरे, राधा नरवलिया, वंदना काकडे, किरण जाणूनकर आणि ज्ञानेश्वर मुळे यांनी विशेष मेहनत घेतली. वाशिम एलसीबीचे संतोष वाघ, तेजस्विनी खोडके आणि सुनील तायडे यांचे सहकार्य लाभले. या पोर्टेबल मशीनद्वारे यापूर्वी किती ठिकाणी गर्भलिंग निदान झाले? या कथित रॅकेटचे जाळे आणखी किती जिल्ह्यांत पसरले आहे? या प्रश्नांची उत्तरे पुढील तपासातून समोर येणार आहेत!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!