बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पुण्यासारख्या मोठ्या शहरात दररोज लाखो प्रवाशांना घेऊन धावणारी मेट्रो… आणि त्या मेट्रोचा वेग, ब्रेक, हजारो प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी आता बुलढाणा जिल्ह्याच्या एका लेकीच्या हातात आहे.तिचं नाव प्रतीक्षा राजगुरे असे आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या या लेकीची पुणे मेट्रोमध्ये पायलटपदी नियुक्ती झाली आहे. आणि ही केवळ नोकरी नाही, हा संपूर्ण जिल्ह्याच्या अभिमानाचा क्षण आहे. मेट्रोच्या चालकाच्या भूमिकेत बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारी प्रतीक्षा ही जिल्ह्यातील पहिली लेक असल्याचे सांगितले जात आहे. आजपर्यंत अनेकांनी मेट्रोने प्रवास केला असेल, पण मेट्रो चालवणारी आपल्या जिल्ह्याची लेक… हे स्वप्न प्रतीक्षाने सत्यात उतरवलं आहे. एका छोट्याशा जिल्ह्यातून मोठी स्वप्नं घेऊन निघालेली प्रतीक्षा हीने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. रात्र-दिवस मेहनत केली.
स्पर्धा, परीक्षा, प्रशिक्षण प्रत्येक टप्पा जिद्दीने पार केला. आणि अखेर तिने ते मानाचं स्थान मिळवलं, ज्यासाठी हजारो तरुण-तरुणी प्रयत्न करतात आज ती जेव्हा मेट्रोच्या कॅबिनमध्ये बसते, तेव्हा तिच्या हातात फक्त स्टिअरिंग नसतं, तर हजारो प्रवाशांचा विश्वास असतो. त्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी ती तितक्याच आत्मविश्वासाने सांभाळतेय.
प्रतीक्षाची ही यशोगाथा बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक मुलीसाठी, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. “मुलगी म्हणजे फक्त घर सांभाळायचं” ही जुनी मानसिकता तिने आपल्या कर्तृत्वाने मोडीत काढली आहे.
छोट्या जिल्ह्यातून आलेली मुलगीही मोठ्या शहराची मेट्रो चालवू शकते, हे तिने सिद्ध करून दाखवलंय. प्रतीक्षा राजगुरेला ‘हॅलो बुलढाणा’कडून मनापासून शुभेच्छा आणि सलाम!













Total Users : 3807428