बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला, शेतीमालाला भाव नाही, उत्पादन खर्चही निघत नाही! मग एकाच शेतकऱ्याच्या नावावर एवढी संपत्ती कशी उभी राहिली? असा सवाल उपस्थित करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर नाव न घेता केलेल्या टीकेतून जोरदार निशाणा साधला.
‘तुमच्या वावरात नेमकं कोणतं खत वापरलं? कोणतं बियाणं पेरलं? की हजारो कोटींची माया जमली, शेकडो-हजारो एकर जमीन झाली, एवढ्या गाड्या, प्लॉट आणि मालमत्ता निर्माण झाली? बाकी शेतकऱ्यांनाही हे गुपित सांगा!’ अशा शब्दांत तुपकरांनी उपरोधिक सवालांची सरबत्ती केली.
‘शेतकऱ्यांना फायदा करून घ्यायचा असेल तर गाडीवर भूमिपुत्र लिहावं लागेल काय?’ असा टोलाही त्यांनी लगावला. एवढ्यावरच न थांबता शासकीय जागेवरील कथित अतिक्रमणाचाही मुद्दा उपस्थित करत त्यांनी संपत्तीच्या स्रोतांबाबत प्रश्न विचारले.
‘बुलढाणा जिल्ह्यात कोणत्याच नेत्याची आपल्या भागात अशी दहशत नाही!’असा आरोप करत तुपकर म्हणाले की, एखाद्याने सभा घेतली तरी ती कोणी आयोजित केली, याची चौकशी करणारे फोन येतात.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाषणं देण्यापेक्षा स्वतःच्या आर्थिक प्रगतीचं रहस्य शेतकऱ्यांना समजावून सांगावं, असं आव्हान त्यांनी दिलं.दरम्यान, तुपकरांच्या या आरोपांना प्रतापराव जाधव काय प्रत्युत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे













Total Users : 3807426