spot_img
spot_img

गावठाणाचा नकाशा कधी, हक्काची मिळकत पत्रिका कधी? शेलुदच्या ड्रोन सर्व्हेसाठी शिराळेंची धडक मागणी!

शेलुद, ता. चिखली (हॅलो बुलढाणा) घर आहे, जागा आहे; पण मालकी हक्काच्या स्पष्ट नोंदींचे काय? शेलुदच्या गावठाणातील मिळकतींच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा युवा सेना कार्यकर्ता शिवाजी किसनराव शिराळे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे आवाज उठवला आहे.

केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत संपूर्ण गावठाणाचा ड्रोन सर्व्हे करून जीआयएस आधारित डिजिटल नकाशे तयार करावेत आणि प्रत्येक पात्र मिळकतधारकाला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड द्यावे, अशी त्यांची ठाम मागणी आहे.

गावातील घरे, जुने वाडे, निवासी भूखंड आणि खुल्या जागांच्या मालकीबाबत स्पष्ट, अद्ययावत नोंदी नसल्याने नागरिकांसमोर अडचणी निर्माण होतात. खरेदी-विक्री आणि वारस नोंदींच्या प्रक्रियेतही हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे सर्वेक्षणाला गती देऊन मिळकत पत्रिका उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. आता या आश्वासनाचे प्रत्यक्ष सर्वेक्षणात रूपांतर कधी होणार आणि शेलुदकरांच्या हातात हक्काची मिळकत पत्रिका कधी पडणार, हा प्रश्न कायम आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!