spot_img
spot_img

EXCLUSIVE ‘पुढे गांजा पकडलाय… आम्ही साहेब आहोत!’ संग्रामपुरात शेतकऱ्याला भररस्त्यात रोखलं; सोन्याची अंगठी घेऊन पुडीत दिले खडे! नकली ‘साहेबां’मागे मोठे रॅकेट आहे का? दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; आता बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष एसपी निलेश तांबे यांच्या कठोर कारवाईकडे लक्ष!

संग्रामपूर (हॅलो बुलढाणा) “पुढे गांजा पकडला आहे, चोरी झाली आहे… त्याची चौकशी आमच्याकडे आहे. आम्ही साहेब आहोत!” अशी बतावणी करत दोन अनोळखी व्यक्तींनी ६३ वर्षीय शेतकऱ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची तक्रार तामगाव पोलिसांत दाखल झाली आहे. चौकशीच्या नावाखाली अंगठी घेतल्यानंतर कागदाच्या पुडीत रेतीचे खडे देऊन दोघांनी पळ काढला.

पळशी झाशी येथील शेतकरी गजानन नारायण पाचपोर यांच्या फिर्यादीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास ते संग्रामपूर येथून भारत पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होते. धामणगाव गोतमारे फाट्याजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले.

“आम्ही किती वेळापासून आवाज देत आहोत, तुम्ही थांबत का नाही?” असा जाब विचारत दोघांनी चौकशीचा आव आणला. जवळ काय आहे, असे विचारल्यावर पाचपोर यांनी थैलीमध्ये बँकेची पुस्तके असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी पाहण्यासाठी मागितली.

पाचपोर यांनी पाच ग्रॅम वजनाची, अंदाजे २० हजार रुपये किमतीची अंगठी काढून दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीकडे दिली. त्याने अंगठी कागदात बांधल्याचा देखावा करून पुडी परत दिली. लगेच दोघेही संग्रामपूरच्या दिशेने निघाले.

पुडी उघडताच पाचपोर हादरले!

आत अंगठीऐवजी रेतीचे दोन-तीन खडे होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दुचाकीवरून पाठलाग केला. संग्रामपूरच्या लेंडी नाल्यापर्यंत दोघे दिसले; मात्र वेग वाढवून ते नजरेआड झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शेगावपर्यंत शोध घेऊनही त्यांचा पत्ता लागला नाही.

अखेर पाचपोर यांनी नातेवाईक भागवत गोतमारे यांच्यासह तामगाव पोलीस ठाणे गाठले. संशयितांचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे असून, दोघांनी काळसर टी-शर्ट आणि फुलपॅन्ट घातली होती.

याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पुढील तपास बीट पोलीस हवालदार गाडे करीत आहेत.

या बनावट ‘साहेबां’मागे संघटित रॅकेट आहे का, हे तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. दोघांचा छडा लावून त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्याची गरज असून जिल्ह्यात नकली ‘साहेबां’चा जरा जास्तच सुळसुळाट वाढला असून जिल्ह्यातली ही दुसरी तिसरी घटना आहे, आता कर्तव्यदक्ष एसपी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!