spot_img
spot_img

रक्त असूनही गरिबाला विकत घ्यावं लागलं! स्त्री रुग्णालयातील प्रकारावर महामानव ग्रुपचा संताप!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शासकीय रक्तपेढीत रक्त उपलब्ध असतानाही एका गरीब रुग्णाला खाजगी ब्लड बँकेतून २,००० रुपये देऊन रक्त विकत घ्यायला लावल्याचा गंभीर आरोप महामानव ग्रुपचे सुमित गायकवाड यांनी केला आहे.

स्त्री रुग्णालय, बुलढाणा येथील या प्रकारावर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की,
तन्वीर नामक युवकाची पत्नी स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. तिला O पॉझिटिव्ह रक्ताची गरज असल्याचे सांगण्यात आले. गायकवाड यांच्या दाव्यानुसार, शासकीय रक्तपेढीच्या ऑनलाईन पोर्टलवर O पॉझिटिव्ह रक्ताच्या ४ बॅग उपलब्ध होत्या. तरीही वॉर्डातील कर्मचाऱ्यांनी शासकीय रक्तपेढीशी संपर्क न साधता थेट खाजगी ‘जीवन बुलढाणा अर्बन ब्लड सेंटर’ या खाजगी ब्लड बँकेचे सही शिक्क्यासह मागणीपत्र रुग्णाच्या पतीच्या हातात दिले. शासकीय रक्त मोफत मिळायला हवे असताना त्या रुग्णाला २,००० रुपये देऊन खाजगी बँकेतून रक्त आणण्यास भाग पाडल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. तसेच
अधिकाऱ्यांचे खाजगी ब्लड बँकेशी संगनमत असून यात कमिशनखोरी किंवा आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा संशय महामानव ग्रुपने व्यक्त केला आहे.

▪️आम्ही मोफत रक्त देतो, मग रुग्णांना का पैसे मोजावे लागतात?

आम्ही सेवाभावी संस्था म्हणून ३००-४०० बाटल्या रक्तदान करून मोफत रक्त पुरवठा करतो. तरीही गरिबांना रक्तासाठी वणवण फिरावे लागत असेल, तर ही चिंतेची बाब असल्याचे गायकवाड म्हणाले.या प्रकरणाची माहिती मिळताच गायकवाड यांनी डीन आणि जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) यांच्याशी संपर्क साधला.त्यानंतर संबंधित रुग्णाला रक्त उपलब्ध करून देण्यात आले. या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदनही केले. मात्र, “प्रत्येक वेळी सुमित गायकवाडसारखा व्यक्ती प्रत्येक रुग्णासाठी उपस्थित असू शकत नाही. मग ज्यांचा आमच्याशी संपर्क नाही, त्यांना असेच पैसे देऊन रक्त घ्यायला भाग पाडणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

▪️महामानव ग्रुपचा इशारा!

शासकीय सेवेत असूनही खाजगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर व्यापक आंदोलन छेडण्याचा गायकवाड यांनी इशारा दिला. रक्ताच्या नावावर होणाऱ्या आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली व कोणालाही अशा प्रकारचा त्रास झाल्यास महामानव ग्रुपच्या सदस्यांशी लेखी तक्रारीसह संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!