देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) रात्रीचा अंधार, खडकपूर्णा जलाशयाकाठचा रेतीसाठा अन् एकाच ठिकाणी जमलेले नऊ टिप्पर! महसूल-पोलिसांचे संयुक्त पथक दिसताच चालक वाहने सोडून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद असून, आता या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ने समोर आणलेल्या या प्रकरणामुळे रेतीचोरीच्या कथित प्रयत्नामागील साखळीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ग्राम महसूल अधिकारी संजय तुळशीराम हांडे यांच्या फिर्यादीनुसार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता गस्तीवरील पथकाला जुने मंडपगाव शिवारात जलाशयाकाठी नऊ टिप्पर आढळले. ही वाहने रेतीचोरीच्या उद्देशाने एकत्र आल्याचा आरोप आहे. पथकाची चाहूल लागताच चालकांनी तेथून पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन तहसीलदार प्रमोद खमाट यांच्या पथकाने कारवाई केली. उपलब्ध माहितीनुसार, २ नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजता सुरू झालेली मोहीम दुसऱ्या दिवशी दुपारी दोनपर्यंत चालली. तब्बल १६ तासांच्या कारवाईत नऊही टिप्पर जप्त करून पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला. वाहने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहेत.
जप्त वाहनांमध्ये ‘हरे कृष्णा’ लिहिलेल्या विनाक्रमांकाच्या पांढऱ्या टिप्परचाही समावेश आहे. तहसील कार्यालयाच्या १६ नोव्हेंबरच्या पत्रानुसार हांडे यांनी मंडळ अधिकाऱ्यांसमवेत तक्रार दिली. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ६२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी, उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांच्यासह महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.
नऊ वाहने जप्त झाल्यानंतर आता तपासाची दिशा चालक, वाहनमालक आणि कथित रेतीचोरीच्या प्रयत्नातील संबंधितांची भूमिका स्पष्ट करण्याकडे असायला हवी. केवळ वाहने ताब्यात घेण्यापलीकडे जाऊन उपलब्ध पुरावे, वाहनांची ओळख आणि घटनास्थळी त्यांच्या उपस्थितीचे कारण तपासले जाणे महत्त्वाचे ठरणार आहे













Total Users : 3790960