नांदुरा (हॅलो बुलढाणा) जनावरांना चारापाणी करण्यासाठी त्या नेहमीप्रमाणे वाड्यात गेल्या. खोलीजवळ सोयाबीनचे दाणे विखुरलेले दिसले. दारापाशी पोहोचल्या तर कुलूप लावलेला कोंडा उचकटलेला होता. घरच्यांना बोलावून खोलीत पाहिलं, तेव्हा आत ठेवलेले सोयाबीनचे २० कट्टे गायब होते! जुन्या नांदुऱ्यातील दुर्गानगरात १६ नोव्हेंबरला सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. चोरीला गेलेल्या सोयाबीनची किंमत अंदाजे ७० हजार रुपये आहे.
दुर्गानगरातील शेतकरी ललीता राजेश निखाडे (वय ४५) यांनी यंदा शेतात झालेलं सोयाबीन घराशेजारच्या वाड्यातील एका खोलीत ठेवले होते. सोमवारी सकाळी त्यांच्या सासू पार्वती पैसोडे वाड्यात गेल्या असता त्यांना दरवाजाची अवस्था पाहून संशय आला. त्यांनी तातडीने ललीता आणि त्यांच्या पतीला बोलावले. दोघांनी खोलीत जाऊन पाहिले, तेव्हा शेतातून आणून ठेवलेल्या कट्ट्यांपैकी एकही कट्टा तिथे दिसला नाही.
फोन बंद, खोलीतलं सामानही गायब!
सोयाबीनबाबत काही माहिती मिळते का, हे पाहण्यासाठी निखाडे कुटुंबीय शेजारी भाड्याने राहणाऱ्या गणेश परमेश्वर पैसोडे यांच्याकडे गेले. मात्र ते घरी दिसले नाहीत. दरवाजाला कडी होती आणि फोन लावला असता तो बंद येत होता. कडी उघडून आत पाहिले, तर खोलीत राहण्याचे सामानही दिसले नाही. गणेश पैसोडे यांनी आपल्याला काहीही न सांगता सामान घेऊन खोली रिकामी केली आणि सोयाबीनचे कट्टे चोरून नेले, असा आरोप ललीता निखाडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी १७ नोव्हेंबरला गणेश परमेश्वर पैसोडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा क्रमांक ७२२/२०२६ दाखल केला. पोलीस हवालदार सरोदे यांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास नाईक पोलीस शिपाई ससाने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.













Total Users : 3783470