spot_img
spot_img

BIG EXCLUSIVE! जपानचा माउंट फुजी ज्या यादीत… तिथंच बुलढाण्याचं लोणार! दख्खनच्या काळ्या कातळावर उमटलेल्या उल्केच्या ठशाला जागतिक मान! ‘IUGS’च्या तिसऱ्या १०० भूशास्त्रीय वारसा स्थळांमध्ये लोणार विवराची नोंद

लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) दख्खनच्या काळ्या कातळावर उल्का आदळली आणि बुलढाण्याच्या भूमीत एक विशाल विवर तयार झालं. त्या धडकेचा ठसा आजही लोणारमध्ये दिसतो. आता याच विवराला जागतिक भूशास्त्रीय वारसा स्थळाचा मान मिळाला आहे. ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ जिओलॉजिकल सायन्सेस’ने (IUGS) जाहीर केलेल्या तिसऱ्या १०० स्थळांच्या यादीत ‘लोणार लेक इम्पॅक्ट क्रेटर’ या नावाने त्याची अधिकृत नोंद झाली आहे

 

काळ्या कातळात सापडले उल्केच्या धडकेचे पुरावे!

सुमारे १.८८ किलोमीटर व्यासाचं हे वाटीसारखं विवर दख्खनच्या बेसाल्ट खडकात तयार झालं. अशा खडकात अतिवेगाने उल्का आदळून तयार झालेल्या जगातील पाच ज्ञात विवरांपैकी लोणार एक आहे. विवराच्या उतारांवर दिसणारे खडकांचे थर आणि धडकेच्या प्रचंड उष्णतेने खडक वितळून तयार झालेले काचेसारखे तुकडे आजही त्या घटनेची साक्ष देतात. विवराच्या मध्यभागी असलेलं खारट आणि क्षारीय पाण्याचं सरोवर हे लोणारचं आणखी एक वैशिष्ट्य

बुलढाण्यातल्या विवराचा संबंध थेट चंद्र-मंगळाच्या अभ्यासाशी!

उल्केच्या धडकेने खडकांमध्ये नेमके कोणते बदल होतात, याचा अभ्यास लोणारमध्ये करता येतो. चंद्र आणि मंगळावरील विवरांची निर्मिती समजून घेण्यासाठीही लोणारची रचना संशोधकांना उपयोगी ठरते. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने या स्थळाचा प्रस्ताव ‘IUGS’कडे सादर केला होता. नव्या यादीत ४७ देशांतील स्थळांचा समावेश असून जपानचा माउंट फुजीही त्यात आहे.

लोणार सरोवराला २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या ‘रामसर’ पाणथळ स्थळाचा दर्जा मिळाला होता. आता विवराच्या वैज्ञानिक महत्त्वावरही जागतिक मोहोर उमटली आहे. या मान्यतेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील भू-पर्यटनाला चालना मिळण्याची संधी आहे. त्याच वेळी सरोवराचं पाणी, विवरातील खडक आणि उल्केच्या धडकेचे पुरावे जपण्याचं महत्त्वही वाढलं आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!