जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) दुष्काळाच्या सावटात स्थानिक पशुधनाचा चारा जपण्यासाठी लागू केलेल्या जिल्हाबंदीची निमखेडीच्या सीमेवर कडक अंमलबजावणी झाली. मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या हद्दीत आलेला सुमारे १२ हजार मेंढ्या, २ हजार पिल्ले आणि २५ उंटांचा ताफा १५ नोव्हेंबर रोजी वनविभागाच्या चेकपोस्टवर रोखण्यात आला. वनविभाग आणि पोलिसांनी ताफ्याला पुढे जाण्यास मज्जाव केला.
सातपुड्याच्या डोंगररांगांतून मेंढ्या, उंट आणि गाड्यांचा एवढा मोठा ताफा चेकपोस्टवर पोहोचताच परिसरात धावपळ उडाली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ आणि स्थानिक मेंढपाळांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली. ताफा थांबवल्यानंतर चेकपोस्ट परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते.
आपण अमरावती जिल्ह्याच्या दिशेने जात असल्याचे सांगत मेंढपाळांनी पुढील प्रवासासाठी परवानगी मागितली. मात्र, बाहेरून येणाऱ्या पशुधनावर जिल्हाबंदी लागू असल्याने प्रशासनाने ती विनंती फेटाळली. एकीकडे पुढचा मार्ग बंद झाला, तर दुसरीकडे भुकेल्या आणि तहानलेल्या हजारो मेंढ्या व पिल्लांची सोय करण्याचा प्रश्न मेंढपाळांसमोर उभा राहिला.
अखेर वनविभागाने मेंढपाळांना एका रात्रीच्या मुक्कामाची मुभा दिली आणि त्यानंतर माघारी फिरण्यास सांगितले, अशी माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जळगाव जामोद वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी, पोलिसांची अतिरिक्त कुमक आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान चेकपोस्टवर तैनात करण्यात आले होते.
दुष्काळी परिस्थितीत बुलढाणा जिल्ह्यातील पशुधनाला चाऱ्याची टंचाई भासू नये, या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी बाहेरून येणाऱ्या गुराढोरांवर निर्बंध लागू केले आहेत. त्या आदेशामुळे हजारो जनावरांचा ताफा सीमेवरच अडला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन आणि सीमेवरील जिल्हाबंदीची अंमलबजावणी या दोन्ही मुद्द्यांवर आता जळगाव जामोद तालुक्यात चर्चा सुरू आहे.













Total Users : 3771117