मेहकर (हॅलो बुलढाणा) दिवाळीच्या तोंडावर पेनटाकळीच्या पाण्यासाठी उकळी-सुकळीत आंदोलन पेटले! मेहकर तालुक्यातील लाभक्षेत्राला सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख गजानन बोरकर रात्री दोन वाजल्यापासून टॉवरवर आहेत. ‘धरणातून पाणी सुटल्याशिवाय खाली उतरणार नाही,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
तुरीचे पीक हातातून जाण्याची वेळ आली आहे. आता हळद आणि कपाशी तरी वाचवा, अशी शेतकऱ्यांची आर्त हाक आहे. पिकांना तातडीने पाणी हवे असताना राजकीय श्रेयवादात शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची खंत आंदोलनस्थळी व्यक्त झाली.
मेहकर-लोणारचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी घटनास्थळी जाऊन बोरकरांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, प्रत्यक्ष पाणी सुटेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका बोरकर आणि ग्रामस्थांनी घेतली. त्यानंतर खरात यांनी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. आजच पाणी सोडण्याची विनंती अभियंत्यांनी मान्य केली असून, संध्याकाळपर्यंत पेनटाकळी धरणातून पाणी सोडले जाईल, अशी माहिती खरात यांनी दिली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील ५२ प्रकल्पांतूनही गरजेनुसार पाणी सोडले जाणार असल्याचे सांगण्यात आले. आता लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष धरणातून प्रत्यक्ष पाणी कधी सुटते, याकडे लागले आहे.











Total Users : 3725194