जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) गावातला कचरा गोळा करण्यासाठी डस्टबिन खरेदी केल्या, पण त्याच डस्टबिन ग्रामपंचायतीत धूळ खात पडल्याची तक्रार आहे. जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे शासकीय निधीतून अनेक महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या प्लास्टिक डस्टबिनचे वाटप अद्याप झाले नसल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते योगेश तायडे यांनी निदर्शनास आणली. नागरिकांच्या सुविधेसाठी पैसा खर्च झाला, मग सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचणार कधी, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
संबंधित ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याच्याही तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. गावातील मूलभूत सुविधा आणि विकासकामांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडून साधे डस्टबिन वाटपही वेळेत का झाले नाही, असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.
डस्टबिन नेमक्या कधी खरेदी केल्या? किती नग घेतले? त्यासाठी किती निधी खर्च झाला? आणि खरेदीनंतरही वाटप कोणत्या कारणाने रखडले? या चारही मुद्द्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी तायडे यांनी केली आहे. चौकशीत संबंधित ग्रामसेवकाचा निष्काळजीपणा आढळल्यास कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशीही त्यांची मागणी आहे.
खरेदीचा हिशेब आणि वाटपाची तारीख ग्रामपंचायत जाहीर करणार का? खेर्ड्यातील ग्रामस्थांना आता याच प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.











Total Users : 3725192