वरवंड (हॅलो बुलढाणा) पिकांना जगवण्यासाठी सकाळीच शेत गाठले; पण त्याच शेतात काळाने घाला घातला! तलावातील मोटारीची पाहणी करताना विजेचा धक्का बसून सागर गायकवाड (वय २७) या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी, आज १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथे घडलेल्या दुर्घटनेने परिसर सुन्न झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर सकाळी सहाच्या सुमारास घरून शेताकडे गेले होते. मोटार सुरू करूनही पाणी येत नसल्याने बिघाड तपासण्यासाठी ते तलावात उतरले. यावेळी पाण्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसल्याने ते पाण्यातच कोसळले. आसपासच्या शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी धाव घेत वीजपुरवठा बंद केला. सागर यांना बाहेर काढण्यात आले; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मनमिळाऊ आणि कष्टाळू सागर यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी आहे. कुटुंबाचा आधार अचानक हिरावल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीचे पितृछत्र हरपल्याने गावभर हळहळ व्यक्त होत आहे. पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा असा अंत झाल्याने शेतीतील विद्युत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेमुळे वरवंड गावावर शोककळा पसरली आहे.





Total Users : 3701427