शेलूबाजार, दि. ३० ऑक्टोबर (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांना आश्वासनांचे गाजर नको, थेट खात्यात आर्थिक मदत द्या! या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हजारो शिवसैनिक आणि शेतकरी आज शेलूबाजार येथे समृद्धी महामार्गावर धडकले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, आमदार नितीन बापू देशमुख यांच्यासह अन्य आमदार आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली.
कोरडा दुष्काळ, पावसाची पाठ आणि नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या बळीराजासाठी हे आंदोलन करण्यात आले. शिवसेना उपनेते आमदार नितीन बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्यात आला.
यावेळी आमदार संजय देरकर, राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवंत, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, नगराध्यक्ष किशोर गारोळे, उपजिल्हाप्रमुख आशीष राहाटे यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. मेहकरचे आमदार खरात आणि नगराध्यक्ष गारोळे यांच्या सहभागामुळे आंदोलनात मेहकरचे प्रतिनिधित्वही ठळकपणे दिसले.
शेतकऱ्यांना भरघोस अनुदान द्या, नुकसानभरपाई तातडीने मंजूर करा आणि मदतीची रक्कम थेट बँक खात्यांत जमा करा, अशा ठाम मागण्या आंदोलकांनी केल्या. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आधार देण्याची मागणी यावेळी केंद्रस्थानी होती.
‘अटकेने शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही; बळीराजाच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील,’ असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला





Total Users : 3688978