spot_img
spot_img

मोठी बातमी! आमदार संजय गायकवाडांवर कारवाई होणारच! आनंद परांजपेंचा स्पष्ट इशारा; ‘शेतकऱ्यांविरोधातील वक्तव्य खपवणार नाही,उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे कठोर कारवाईचे आदेश!’

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्यावर खुलासा केला असतानाच शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांविरोधातील कोणतेही वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही आणि कारवाईबाबत एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट आदेश आहेत, असे परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

शेतकरी अडचणीत असताना शिवसेना मदतीला धावून जाते. अशावेळी शेतकऱ्यांविरोधात असंवेदनशील वक्तव्य करणे स्वीकारले जाणार नाही. गायकवाड यांच्या वक्तव्याचा करावा तितका निषेध कमीच आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया परांजपे यांनी दिली. त्यांच्या या भूमिकेमुळे गायकवाड यांच्या खुलाशानंतरही पक्षीय कारवाईचा प्रश्न कायम आहे.

दरम्यान, आपण शेतकऱ्यांबद्दल बोललोच नव्हतो; व्यसनाधीन तरुणांच्या आत्महत्यांनंतर उघड्यावर पडणाऱ्या कुटुंबांच्या संदर्भात वक्तव्य केले होते, असा दावा गायकवाड यांनी केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आणि पक्षाच्या वरिष्ठांच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करतो, असेही त्यांनी सांगितले. मात्र, निलंबनाबाबत विचारताच त्यांनी ‘नो कमेंट्स’ म्हणत अधिक बोलणे टाळले.

भविष्यात शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने किंवा लोकप्रतिनिधीने अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत, असे आदेश सर्वांना देण्यात आल्याचे परांजपे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता गायकवाड यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!